कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. काही महिन्यांपूर्वी कमी झालेल्या कोरोनाने पुन्हा डोक वर काढायला सुरुवात केली आहे. राज्यातील वाढती रूग्णसंख्या आणि पुन्हा टाळेबंदी होण्याच्या भीतीमुळे मुंबई आणि राज्याच्या अंतर्गत भागांत रोजगारासाठी आलेले नागरिक परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, दादर स्थानकातही परगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली. तर लोकमान्य टिळक टर्मिनसवर शनिवारी सकाळपासून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांनी मोठी गर्दी केली.
मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाने शहरात कडक निर्बंध लागू केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून जनतेशी साधलेल्या संवादादरम्यान पुन्हा टाळेबंदीचे संकेत शुक्रवारी दिले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या अनुभवाने धास्तावलेल्या कामगारांनी परत एकदा गावची वाट धरली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकात परराज्यात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर शनिवारी अचानक गर्दी वाढल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. शनिवारी ठाकरे यांनी प्रसारमाध्यमे, व्यायामशाळा चालक, मराठी नाटय़ निर्माता संघ तसेच राज्यातील मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
Comments
Loading…