देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण सुरु असल्याची घटना ताजी असतानाच आता अनेक जिल्ह्यात लसीच्या तुटवड्याअभावी लसीकरण केंद्रे बंद पडल्याची घटना समोर आली आहे. त्यातच केंद्र आणि राज्यात लसीच्या मागणीवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यामुळे बंद पडलेली लसीकरण केंद्रे उद्या सुरु होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येत्या ३ दिवसांपर्यंत पुरेल इतकाच करोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती दिली होती. केंद्र सरकारकडून होणाऱ्या लसींच्या पुरवठ्याविषयी राजकीय वाद निर्माण झाला आहे. त्यांनतर सातारा, सांगली, नगर, पनवेल या जिल्ह्यातील काही लसीकरण केंद्रे लसीच्या तुटवड्या अभावी ठप्प झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
साताऱ्यामध्ये लसीचा साठा संपलेला असल्यामुळे उद्यापासून लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण मोहीम थांबवावी लागत असल्याचं साताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितलं आहे.
दरम्यान साताऱ्यासह सांगली, नगर, पनवेल या जिल्ह्यातही काही लसीकरण केंद्रावर लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रे ठप्प झाली आहेत. या केंद्रावर उद्या पर्यत लसीचा साठा उपलब्ध होणार का ? तसेच लसीकरण केंद्र पुन्हा सुरु होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Comments
Loading…