in

चंद्रपुरकरांचा यंदा POP मूर्तींना नकार; १०० टक्के पर्यावरणपूरक गणेशोत्सव

अनिल ठाकरे | चंद्रपूर : यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने व्यापक जनजागृती केली. त्याचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. यावर्षी एकही पीओपी मूर्तीची विक्री झाली नाही. शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी मनपाच्या कृत्रिम कुंडाचा लाभ घेत ८०६४ गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरकरित्या केले. तसेच १४३ गणेशभक्तांनी मनपाच्या फिरत्या विसर्जन कुंडाचा लाभ घेतला. दरम्यान, कृत्रिम कुंडात संकलित झालेली माती पुनर्वापरासाठी मूर्तिकारांना परत करण्यात आली आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने यंदा पूर्णतः पर्यावरणपूरक उत्सवावर भर देण्यात आला होता. महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी मूर्तिकार व विक्रेते यांच्या बैठका घेऊन पीओपी मूर्तींच्या प्रतिबंधाविषयी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व कृतीत देखील उतरला. त्याचप्रमाणे महापालिका प्रशासनाने विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे देखील नागरिकांच्या उत्साहात सक्रिय भर पडली. तसेच सदर मोहिमेच्या यशस्वीतेसाठी स्वच्छता विभागाचे अधिकारी, मूर्तिकार प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी यांनी पीओपी मूर्ती तपासणी करून योगदान दिले. गणेशाची स्थापना झाल्यानंतर दीड दिवसांच्या विसर्जनापासून अनंत चतुर्दशीपर्यंत झालेल्या विसर्जनासाठी शहरात २७ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड व १९ निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. तसेच तिन्ही झोनमध्ये फिरते विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली.

या सुविधेचा पुरेपूर लाभ नागरिकांनी घेतला. महापौर राखी कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या पर्यावरणस्नेही गणेशोत्सव मोहीमेला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी चंद्रपूर शहरात अत्यंत भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाची सांगता झाली. अखेरच्या दिवशी शहरात एकूण २३३९ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. मागील दहा दिवसांत तब्बल ८०६४ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्यात झोन १ मध्ये २६३३, झोन २ मध्ये ३१९७, झोन ३ मध्ये २०९१ गणेश मूर्तींचा समावेश आहे. तसेच फिरत्या विसर्जन कुंडात एकूण १४३ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

यंदा पीओपीला नकार चंद्रपूर शहरात मागीलवर्षी पर्यंत पीओपी मूर्तीची मोठ्या प्रमाणात विक्री आणि खरेदी झाली होती. मागील वर्षी महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात एकूण ७८१३ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यात पीओपीच्या १०४९ मूर्ती आढळून आल्या. त्यामुळे जलप्रदूषण वाढले. पर्यावरणाला घातक ही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी मनपाचे मूर्तिकार आणि स्वयंसेवी संस्थांना विश्वासात घेऊन पीओपी विरोधात जनजागृती केली. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे वारंवार करण्यात आलेल्या आवाहनाला चंद्रपूरकर जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे यंदा एकही पीओपी मूर्ती आढळून आली नाही. इतकेच नव्हेतर तलाव आणि नदीच्या पात्रात विसर्जन न करता १०० टक्के पर्यावरणपूरक उत्सव साजरा केला. मनपाच्या कुंडात जमा झालेली माती मूर्तिकारांना पुनर्वापरासाठी देण्यात आली आहे. यामुळे भविष्यात मातीची बचत आणि खर्च वाचणार आहे.

गणेशोत्सव २०२१
फिरते कुंड विसर्जन : १४३
मातीची मूर्ती – ७९०३
पीओपी मूर्ती- शून्य
एकूण विसर्जन : ८०६४

गणेशोत्सव २०२०
फिरते विसर्जन कुंड – १६६
मातीची मूर्ती – ६५९८
पीओपी मूर्ती- १०४९

एकूण विसर्जन : ७८१३

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज कुंद्राला जामीन मंजूर

डोक्यावरचं छप्पर गेलेल्यांना ‘नाम’ फाऊंडेशनचा मदतीचा हात