लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई उपनगरी रेल्वे सामान्य प्रवाशांसाठीही १ फेब्रुवारीपासून खुली होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ज्या प्रवाशांच्या पासची मुदत संपली, त्यांना येत्या सोमवारपासून शिल्लक राहिलेल्या दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती पश्चिम व मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 24 मार्च 2020 पासून मुंबई लोकल सेवा बंद करण्यात आली. परंतु, त्यापूर्वी ज्या प्रवाशांनी मुंबई लोकलचे एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांचे पास काढले होते. अशा प्रवाशांची मुदत लॉकडाऊनमध्येच संपली आहे. परंतु, लोकल सेवा बंद असल्यामुळे सामान्य प्रवाशांनी काढलेल्या पासना मुदतवाढ मिळणार की, नाही? असा प्रश्न सतत प्रवाशांकडून विचारला जात होता. मात्र, रेल्वे प्रशासनानं यासंदर्भात स्पष्टीकरण देत, प्रवाशांना पासची मुतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

लॉकडाऊननंतर रेल्वे पासचे जेवढे दिवस शिल्लक राहिले आहेत, तेवढी मुदतवाढ प्रवाशांना देण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या पासधारकांना दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्यांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे.

कधी प्रवास करता येईल :
सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे.
कधी प्रवास करता येणार नाही :
सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवेने प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.