लोकशाही न्यूज नेटवर्क | कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दहा महिन्यांपासून मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी अजूनही बंद आहे. मात्र आता मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे येत्या २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान सामान्य नागरिकांसाठी लोकल सुरू होऊ शकते, अशी शक्यता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वर्तवली आहे.

”लोकल सुरु करण्याबाबत मी कालच एक बातमी ऐकली आणि आजच आम्हला बोलवलंय. मला वाटतं कदाचित 29 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीपासून कदाचित मुंबई लोकलं सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे.” तसेच “जरी लोकल सुरु झाल्या तरी लोकांनी आपली काळजी घेतली पाहिजे. तोंडावरचा मास्क आणि हातात सॅनिटायझर तुमच्या जवळ असलं पाहिजे आणि सोशल डिस्टंन्सिग पाळणं गरजेचं आहे. असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

सध्याच्या घडीला विविध २० घटकांना लाेकल प्रवासाची मंजूरी आहे. महिलांना प्रवासाची मुभा मिळाल्याने लाेकलच्या गर्दीत वाढ झाली आहे. त्यातच रेल्वे वाहतूकीच्या समस्येतून सुटण्यासाठी विना तिकिट आणि बनावट आेळखपत्राच्या आधारे प्रवास करणार्‍याची संख्या वाढू लागली आहे. काेराेनामूळे साेशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यासाठी एका लाेकलमध्ये ७०० प्रवाशांना प्रवासाची परवानगी आहे.

परंतु लाेकलला हाेणार्‍या गर्दीमुळे साेशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे तीनतेरा वाजत आहे. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसभरात १२०१ लाेकल फेर्‍या चालविण्यात येत आहे. तर प्रवासी संख्या ११ लाख ५० हजारांच्या घरात पाेहाेचली आहे.परिणामी लाेकलची संख्या वाढविण्यात येत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. सर्व लाेकल सुरु करण्यात येत आहेत, सर्वांना लाेकल प्रवासाची परवानगी नाही असे देखील सुमित ठाकूर यांनी स्पष्ट केले.