in

‘काय सांगावे! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी मिस्टर ब्राऊन यांना ‘भारतरत्न’ दिला जाईल’

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प वादाचा मुद्दा ठरला. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरातून पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून टीका केली आहे. “आमच्या राज्यकर्त्यांनी घर बांधले. लोकांना काय मिळाले? करोनामुळे देशातील ९७ टक्के जनता गरिबीच्या उंबरठ्यावर आहे. एप्रिल २०२० मध्ये १३ कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. फक्त स्मशाने आणि कब्रस्ताने तेवढी चोवीस तास उघडी आहेत,” असा संताप राऊत यांनी व्यक्त केला आहे.

“मेहुल चोक्सीचे प्रकरण सध्या गाजते आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला हा एक आरोपी. जगाच्या हिरे बाजारात तेव्हा नीरव मोदी व मेहुल चोक्सीचे वलय होते. बँकेचे १२ हजार कोटी बुडवून त्यांनी देशाबाहेर पलायन केले. ऑण्टिग्वा नामक देशात, तेथील नागरिकत्व घेऊन चोक्सी राहू लागले. ऑण्टिग्वासारख्या अनेक देशांत नागरिकत्व आणि पासपोर्ट विकत घेता येतो. चोक्सी याच पद्धतीने त्या देशाचा नागरिक झाला. आठ-पंधरा दिवसांपूर्वी तो डॉमिनिका नावाच्या देशात घुसत असताना पकडला गेला. सध्या तो डॉमिनिकाच्या तुरुंगातून सरकारी इस्पितळात दाखल झाला. भारतीय गुप्तचरांनी आपल्याला जबरदस्तीने पळवून नेले, ताब्यात घेतले असा मेहुल चोक्सीचा दावा आहे. मेहुल चोक्सी ऑण्टिग्वाचाच नागरिक आहे. त्यामुळे भारताच्या ताब्यात देता येणार नाही, असे चोक्सीचे वकील सांगतात. चोक्सीच्या प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच भारताचे एक खासगी जेट विमान ‘डॉमिनिका’च्या विमानतळावर उतरले व थांबून राहिले. चोक्सीला आणण्यासाठीच हे खास विमान पाठवले, पण चोक्सी भारतात येणार आहे काय?,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

“ऑण्टिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांना करोना काळात इतका वेळ आहे की, ते भारतातील बहुतेक सर्वच वृत्तवाहिन्यांना मुलाखती देताना दिसत आहेत. पंतप्रधान ब्राऊन यांचा दावा आहे की ”मेहुल चोक्सी हा आमच्या देशातील विरोधी पक्षाला देणग्या देत असतो. त्यामुळे ऑण्टिग्वाच्या विरोधी पक्षाचा मेहुल चोक्सीला भारतात पाठिवण्यास विरोध आहे.” म्हणजे मेहुल चोक्सी हा भारतीय भगोडा ऑण्टिग्वाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. चोक्सीपासून आपल्या सत्तेला खतरा आहे म्हणून त्याला भारतात पाठवा, हा ब्राऊन यांचा आग्रह आहे. ब्राऊन यांनी चोक्सीला भारताच्या हवाली केलेच तर नव्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात ब्राऊन यांचा पुतळा नक्कीच उभारला जाईल. २०२२ च्या प्रजासत्ताक दिनाचे ते सन्माननीय पाहुणेही असतील, काय सांगावे! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी मिस्टर ब्राऊन यांना ‘भारतरत्न’ही दिले जाईल,” असा टोला राऊत यांनी मोदींना लगावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खासगी रुग्णालयांकडे लशीचा ५० टक्के साठा

छत्रपती संभाजीराजे आज रायगडावरून जाहीर करणार भूमिका