अक्षय कुमार, कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका, त्याला रणवीर सिंग आणि अजय देवगणच्या कॅमिओची जोड आणि याला दिग्दर्शन रोहित शेट्टीचं म्हणजे सिनेमा हिट ठरणार हे ठरलेलच. हा सिनेमा म्हणजे बहिप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘सूर्यवंशी’. हा सिनेमा गेल्या वर्षी म्हणजे 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार असं जाहीर करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला सिनेमा भेटीला येणार होता. मात्र तो रखडला. अखेर या वर्षी म्हणजे 2021ला सिनेमा बॉक्स ऑफिस गाठणार आणि ते पण 30 एप्रिल रोजी असं ठरलं पण आता पुन्हा सिनेमा रखडणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
खिलाडी अक्षयचा ‘सूर्यवंशी’ सिनेमा या वर्षी 2 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार अशी जोरदार चर्चा वर्षाच्या सुरूवातीला रंगली. पण काहीच दिवसात अक्षयच्या ‘बेलबॉटम’ सिनेमाचं रिलीज जाहीर झालं आणि 2 एप्रिल ही तारीख जाहीर करण्यात आली. अखेर यावर तोडगा काढत सिनेमाचं रिलीज 2 एप्रिल नाही तर 30 एप्रिल 2021 रोजी करावं असं ठरलं. या साठी एक नवीन व्हिडिओ सुद्धा रिलीज केला गेला. त्यात ‘रुही’ हा सिनेमा रिलीज झाला आणि त्याला उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळाला. त्यामुळे ‘सूर्यवंशी’चं रिलीज देखील जाहीर झालं आणि हा सिनेमा क्राऊड पुलर ठरेल असं म्हंटलं जात होतं. पण पुन्हा आता सिनेमाच्या रिलीजला घेऊन नवीन चर्चा रंगू लागल्या आहेत.
पुन्हा एकदा कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. त्यामध्ये पुन्हा सिनेमागृहांवर 50 टक्के क्षमतेची मर्यादा लावण्यात आली आहे. दरम्यान येत्या दोन दिवसात माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवीन नियमावली जाहीर करु शकतात किंवा लॉकडाऊन देखील जाहीर होऊ शकतं. यामुळे पुन्हा एकदा सिनेमांच्या रिलीजवर बंधनं येतील. काही दिवस परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असं म्हंटलं जात आहे. तर पुन्हा एक प्रश्न प्रेक्षकांसमोर उभा राहिला आहे तो म्हणजे, ‘आ रही हैं पुलीस…पण कधी?’
Comments
Loading…