लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने विजय मिळवला. आता इंग्लंडविरूद्ध ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी नियमित कर्णधार विराट कोहलीचे संघात पुनरागमन होणार आहे. पण त्याआधी विराट कोहली आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. विराटला केरळ उच्च न्यायालयाकडून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

कोहली सदिच्छादूत (ब्रँड अँबेसेडॉर) असलेल्या एका ऑनलाईन रमी गेममुळे त्याला ही नोटीस आली आहे. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, कोहलीचा चाहतावर्ग मोठा असून तो अशा जाहिरातींच्या माध्यमातून तरुणांना ऑनलाइन गेमिंगसारख्या चुकीच्या मार्गाला जाण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. कर्णधार विराट कोहली हा एका ऑनलाइन रमी गेमची जाहिरात करतो.

त्याच्यासोबत प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता अजू वर्गीस हेदेखील याच रमी गेमची जाहिरात करतात. त्यामुळे या याचिकेच्या आधारावर केरळ उच्च न्यायालयाने या तिघांनाही नोटीस बजावली आहे.

तिरुअनंतपुरमच्या विनीथ नावाच्या तरुणाचे हा गेम खेळल्याने २१ लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे त्याने आत्महत्या केली. साजेश नावाच्या व्यक्तीलादेखील या गेममुळे खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मी स्वतः देखील ६ लाख रुपये या गेमच्या व्यसनामुळे गमावले. इतरही अनेक लोकांना यामुळे भरपूर नुकसान होते आहे अशा बाबी नमूद करत याचिकाकर्त्याने माननीय न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी विनंती केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने या तिघांना नोटीस बजावली आहे.